
डोळ्यावर पट्टी बांधून खेडमध्ये काढली जनजागृती फेरी
खेड : शहरात जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेडच्यावतीने जनजागृती फेरी काढण्यात आली. यामध्ये लायन्स सदस्य व अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी स्वतः च्या डोळ्यावर पट्टी बांधून अंध व्यक्तीच्या जीवनातील दैनंदिन आव्हाने अनुभवण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमात माजी आमदार संजय कदम, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, माजी नगराध्यक्ष विजय चिखले, लायन अध्यक्ष डॉ. विक्रांत पाटील, संभाजी देवकाते, वैजेश सागवेकर यांनी स्वतः डोळ्यावर पट्टी बांधूनच सहभाग घेतला.
शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथून जनजागृती फेरी सुरू झाली. तळ्याचे वाकन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाजारपेठमार्गे फेरी काढण्यात आले. ‘जिते जिते रक्तदान, जाते जाते नेत्रदान!’ ‘दया नको, भीक नको, न्याय द्या संधी द्या!’ अशा घोषणा देत फेरीचा समारोप
झाला.
दृष्टी नावाचे पथनाट्य सादर झाले. मिलिंद तलाठी यांनी फेरीचे उत्तम नियोजन केले. या फेरीमध्ये शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये श्रीमान चंदुलाल हायस्कूल, एस. एम. हायस्कूल, अल मदिना स्कूल, समर्थ कृपा इंग्लिश स्कूल वेरळ आदींचा समावेश होता.
डॉ. अंकुश यादव, राजेंद्र खेडेकर, अंकुश विचारे, पंकज शाह, सर्व लायन्स क्लबचे सदस्य यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.