रत्नागिरी तालुक्यात जनावरांचे लसीकरण
रत्नागिरी: तालुक्यामध्ये लंपी स्कीनची बाधित पाळीव जनावरे आढळून आली नसली तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ९ हजार ९०५ जनावरांना लस देण्यात आली असल्याचे पशु विभागाकडून सांगण्यात आले.
लंपी स्कीन हा विषाणूजन्य त्वचारोग आहे. विदेशी वंशाच्या आणि संकरीत वंशाच्या गायींमध्ये देशी वंशाच्या गाईपेक्षा रोग बाधेचे प्रमाण अधिक आढळून येते. उष्ण व दमट हवामान रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणार्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी जनावरांचे विवीध स्त्राव जसे डोळयातील पाणी, नाकातील स्राव, लाळ आदीमधुन हा विषाणु बाहेर पडुन चारा व पाणी दुषित होवुन इतर जनावरांना या रोगाची लागण होवु शकते. या रोगामध्ये अंगावर १० ते २० मीमी व्यासाच्या गाठी येतात. सुरवातीस भरपुर ताप, डोळयातून नाकातून चिकट स्त्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद, दुध उत्पादन कमी व काही जनावरात पायावर सुज येणे व लंगडणे या सारखी लक्षणे दिसुन येतात. रोगी जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.