
पूररेषा राजापूरवासीयांच्या मुळावर; न्यायालयात दाद मागणार
राजापूर : शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे शहरातील पूररेषेचे पुन्हा सर्वेक्षण करून जलसंपदा विभागाकडून नव्याने निश्चित करण्यात आलेली पूररेषा ही शहरवासीयांच्या मुळावर येणार आहे. गाळाने भरलेल्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुराच्या पाण्याच्या पातळीची तशाच प्रकारे निश्चिती करून या विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या या पूररेषेमुळे निम्म्या राजापूर शहरवासीयांना स्थलांतरीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आता थेट न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय राजापूरवासीयांनी घेतला आहे.
पुनर्निरीक्षण करून निश्चित करण्यात आलेली राजापूर शहराची पूररेषा ही चुकीची आणि जाचक असून अशा पध्दतीने तिची अंमलबजावणी केल्यास भविष्यात कोणालाही बांधकाम करता येणार नाही आणि नगर परिषदेच्या उत्पन्नातही भर पडणार नाही. त्यामुळे या विरोधात दाद मागावीच लागणार असून प्रारंभी जलसंपदा विभागाकडे ही पूररेषा चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून देत ती रद्द करून फेरसर्वेक्षणाची मागणी करू, अन्यथा न्यायालयातही दाद मागण्यात येईल, अशी माहिती माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी दिली आहे.