कोंडसर येथील बछड्याचा मृत्यू नैसर्गिकच; वनविभागाची माहिती
राजापूर : तालुक्यातील कोंडसर बु. गावात संतोष पांचाळ यांच्या घराच्या परिसरातच बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. या मृत बछड्याची जागीच विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती राजापूर वनविभागाने दिली आहे. मात्र हा बछडा याठिकाणी कसा आला याचे गूढ उकलले नसून अजूनही या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर आहे का? असा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात असून सध्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाला या घटनेसंबंधी कळविण्यात आल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली व शवविच्छेदनानंतर त्याचठिकाणी मृत बछड्याचे शरीर जाळून नष्ट करण्यात आले. या बछड्याचा मृत्यू हा नैसर्गिक झाला असल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले आहे. तशी माहिती वनविभागाने दिली आहे.
विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी परिक्षेत्र वनअधिकारी श्री.प्र.ग.सुतार तसेच वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, पोलीस पाटील विजय म्हादये, पशु वैद्यकीय अधिकारी प्रथमेश म्हादये यांनी केली.