धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेलाच मिळणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणार्या आमदार, खासदार यांच्याकडे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. ते हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेलाच मिळणार, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत व्यक्त केला. रत्नागिरी दौर्यावर आलेल्या ना. चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सकाळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या असणार्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष अण्णा करमरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे विचार व विचारांची माणसे ग्रामपंचायतीत पोहोचली पाहिजेत. यासाठी निवडणुकीत उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण आलो असल्याची प्रतिक्रिया ना. चव्हाण यांनी व्यक्त केली.