सोनपात्रा नदीमध्ये रासायनिक सांडपाणी मिसळल्याने भोई समाज आक्रमक
खेड : तालुक्यातील कोतवली येथील सोनपात्रा नदीमध्ये पाईपलाईनचे नट-बोल्ट निखळून रासायनिक सांडपाणी नदीमध्ये मिसळले. पाण्यात मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाला होता. यामुळे किनार्यावरील भोई समाजाने तीव्र संताप व्यक्त केला. अखेर दोन दिवसांनी ही गळती काढण्यात यश आले. या प्रकरणी किनार्यावरील भोई समाज बांधव व एमआयडीसी अधिकार्यांसोबत बैठक होणार आहे व हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे.
सोमवारी (दि. 3) मध्यरात्री मौजे कोतवली (ता. खेड) येथील सोनपात्रा नदीमध्ये पाईप लाईनचे नट बोल्ट निखळून पाईपलाईनला गळती लागली. नदीपात्रात अक्षरशः फेस जमा झाला होता. ही बातमी संघर्ष समितीच्या अध्यक्षांना कळताच त्वरित घटनास्थळी धाव घेतली व परीस्थीतीची पाहणी करून लगेचच संबधित सीईटीपी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, एमआयडीसीच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यानंतर घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यात यावा अशी मागणी केली. त्या नुसार एमआयडीसीचे श्री. हळदणकर, सीईटीपीचे श्री.आहिर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणचे श्री. शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
यावेळी कोतवली गावच्या सरपंच सौ. तांबे, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष संजय जुवळे, उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, सचिव दिलीप दिवेकर, अ. दा. भोई समाज कार्यकारिणी सदस्य दीपक पारधी उपस्थित होते. या संदर्भात लवकरच संबधित खात्यांच्या जबाबदार अधिकार्यांना सोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.