दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतर यंदाच्या दसऱ्याला खरेदीसाठी लगबग
रत्नागिरी : दोन वर्षांच्या कोरोना काळातील प्रतिबंधानंतर यावर्षी नवरात्रोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दसर्या निमित्ताने या उत्सवाची सांगता होत असून, साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्या या मुहुर्तावरील खरेदीच्या दृष्टीने सुवर्णकार, वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरुम सजवण्यात आली आहेत.
जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची सांगता दसर्या दिवशी होणार आहे. मागील तीन दिवस रात्री बारावाजेपर्यंत दांडियाला देण्यात आलेल्या मुदतीमुळे तरुणाईमध्ये उत्साह संचारला होता. जिल्ह्यात यावेळी सार्वजनिक 394 आणि खाजगी 56 अशा एकूण 450 देवींच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
दसर्यानिमित्ताने देवींच्या मूतींचे विसर्जन होणार आहे. या विसर्जन मिरवणुकीची तयारीही मंडळांच्यावतीने करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरामध्ये मांडवी किनार्यावर फक्त देवीची मुर्ती असणार्या वाहनांनाच पोलिसांकडून परवानगी दिली जाणार आहे.
दसरा हा साडेतीन मुहुर्तुांपैकी एक समजाला जातो. या दिवशी खरेदी करण्यावर मोठा भर असतो. सोने, चांदीच्या दागिन्यांसह वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केली जाते. यासाठी शोरुमही सजवण्यात आली आहेत. या दिवशी रत्नागिरीत कोट्यवधीची उलाढाल होणार आहे.