चिपळूणमध्ये ठाकरे-शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा बॅनरवरून दसऱ्यात शिमगा

0
55

चिपळूण : शहरामध्ये भर वर्दळीच्या नाक्यात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना गटात पुन्हा एकदा बॅनर युध्द झाल्याची घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी उशिराने घडली. पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठ्या संघर्षावर नियंत्रण मिळविण्यात आले.
भर वस्तीमधील नाक्यात शिंदे गटाच्या शाखेची स्थापना व दसरा मेळाव्यासंदर्भात समर्थकांच्या बैठक आयोजनाचा बॅनर लावण्यात आला. मात्र, त्याच नाक्यात ठाकरे गट समर्थकांमध्ये या बॅनरवरून वातावरण गढूळ झाले. दरम्यान, ठाकरे समर्थक विरुद्ध शिंदे समर्थक गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या नाक्यात काही वेळातच गोळा होऊ लागले. दोन्ही गट बॅनर विषयावरून काही क्षणात एकमेकांना भिडले. परिणामी, राजकीय वादाचे वादळ सुरू झाले. शिंदे गट समर्थक व पूर्वीचे युवा सेना शहर अधिकारी निहार कोवळे यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात जाण्याच्या नियोजनाकरिता शिंदे समर्थक गट शाखा अशा आशयाचा बॅनर लावून नियोजन संदर्भात बैठकीचे आयोजन केल्याचे निर्देशित केले होते. मात्र, ठाकरे समर्थक गटाला ही बाब रूचली नाही. तर हा बॅनरच गायब झाल्याची जोरदार चर्चा देखील सुरू झाली आणि त्यातूनच वादाची ठिणगी पडून ठाकरे गटाचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम व शिंदे गटाचे निहार कोवळे आपापल्या समर्थकांसह एकत्रित येऊन एकमेकांना भिडल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, नाक्यातील या बॅनर वॉरची माहिती चिपळूण पोलिस ठाण्यात समजताच महिला पोलिस कर्मचार्‍यांसह व दोन पोलिस अधिकार्‍यांसह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. काही काळ नाक्यात तणावाचे वातावरण होते. अखेर दोन्ही गटाच्या आणि पोलिसांच्या समजूतदार व्यक्‍ती व मध्यस्थीमुळे संघर्षावर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु शिंदे गटात बॅनर विषयावरून अद्यापही खदखद असून या गटाकडून या विषयासंदर्भात संशयितांवर कारवाईच्या मागणीसाठी हालचाली सुरू असल्याचे समजते.
यापूर्वी चिपळुणात गतवर्षी आलेल्या महापुरात एकनाथ शिंदे यांनी मदत केली होती. वर्षभरानंतर म्हणजेच दि. 22 जुलै 2022 रोजी शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्‍त करण्यासाठी लावलेल्या बॅनरवरून जोरदार राडा झाला होता. मात्र, मध्यस्थीमुळे अंतर्गत वाद मिटविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here