ग्रामपंचायत कर्मचारी 3 रोजी जिल्हा परिषदेवर धडकणार
रत्नागिरी : ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या शासन दरबारी अनेक प्रलंबित मागण्या आहेत. याची आर्थिक अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचारी 3 रोजी जिल्हा परिषदेवर धडकणार आहेत. कर्मचारी यांच्याकडून धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच देण्यात आले आहे. हे निवेदन संघटनेचे अध्यक्ष किरण पांचाळ व सचिव कृष्णा होडे व पदाधिकारी यांच्या उपस्थित जिल्हा परिषदेला देण्यात आले. या निवेदनात विविध मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. यात अभय यावलकर समितीच्या शिफारशी मान्य करा. या अहवालाप्रमाणे नगरपंचायतीप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी. याचा लाभ द्यावा. शासनाने मान्य केलेली सुधारित वेतन वाढ त्वरित द्यावी. यासाठी जिल्हा परिषदेकडून सहकार्य होत नाही. भहागाई भत्ता मिळावा, राहणी भत्ता मिळावा, भविष्य निर्वाह निधी खाते अद्ययावत करावे, सेवा पुस्तिका अद्ययावत करणे शासनाच्या निर्देशानुसार कर्मचारी यांच्यामधील सदस्यांची बैठक घ्यावी. वाढीव वेतन 57 महिन्यांची थकबाकी मिळावी. वसुलीची जाचक अट रद्द करावी, 10 टक्के कर्मचारी यांची शासकीय भरती प्रक्रिया पूर्ण करा अशा मागण्यांचा समावेश आहे. यासाठीच हे आंदोलन छेडणार असल्याचे संघाचे सचिव कृष्णा होडे यांनी सांगितले आहे.