शारदीय नवरात्रौत्सव

रत्नागिरी :  भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यापासून अनेक सण साजरे व्हायला सुरूवात होते. भाद्रपदामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर वेध लागतात ते म्हणजे शारदीय नवरात्रीचे. आपल्याकडे प्रत्येक सण आणि उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. आपल्याकडे तीनवेळा नवरात्र साजरी करण्यात येते. पण शारदीय नवरात्रीचे महत्व अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरंतर आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत चार महिने अर्थात चतुर्मासात आपल्याकडे अनेक व्रत आणि सण साजरे होत असतात. अश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी नवरात्रौत्सव सुरू होत आहे. अर्थात घटस्थापना आहे दि. 26 सप्टेंबर रोजी आणि दसरा अर्थात विजयादशमी आहे 5 ऑक्टोबर रोजी. नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते तर काही जण नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करतात. हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. त्याशिवाय या नऊ दिवसात नऊ रंगाचे कपडेही परिधान करण्यात येतात. नवरात्रीच्या शुभेच्छा ही देण्यात येतात.
आपल्याकडे वर्षभरात चार नवरात्री साजर्‍या करण्यात येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असून, चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्‍तीचा नाश करून चांगल्या शक्‍ती आणि लाभदायक गोष्टींसाठी का चांगला कालवधी मानण्यात येतो. शरद ऋतुच्या सुरूवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रौत्सव असे म्हटले जाते. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यता येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यसाठीही मोठ्या संख्येने भक्‍त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृतमध्ये नऊ रात्री असा याचा अर्थ होतो. नऊ दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजाअर्चा करण्यात येते. दहाव्या दिवशी रावणदहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
शारदीय नवरात्रौत्सवामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ देवींच्या रूपांची पूजाअर्चा करण्यात येते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रम्हचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रघटा देवीचा मानण्यात येतो तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. पाचवा दिवस स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, सातवा दिवस हा कालरात्री देवीसाठी, आठव्या दिवशी महागौरी देवी आणि नववा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यात येते. मात्र, ही नवरात्र कशी सुरू झाली हे आपण आधी जाणून घेऊया.
नवरात्र नक्‍की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या दोन पौराणिक कथा अगदी पूर्वपरंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा एक दैत्य ब्रम्हदेवाचा भक्‍त होता. त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्याला ब्रम्हदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाःकार माजवायला सुरूवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. नऊ दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी लढून त्याचा दहाव्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला ‘महिषासुर मर्दिनी’ असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. नऊ दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींंशी लढा देण्यासाठीच नवरात्रौत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते.
दुसर्‍या पौराणिक कथेनुसार, श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. नऊ दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होतो. त्यानंतर देवीने लंकाविजयचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला.
शारदीय नवरात्रौत्सव सहसा ऑक्टोबर महिन्यात येतो. आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात घटस्थापना करण्यात येते. पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा करण्यात येते. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. देवीला वेगवेगळ्या नऊ रंगांचे वस्त्र नऊ दिवस परिधान करण्यात येते.
यामध्ये कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येते. पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात नऊ प्रकारचे धान्य पेरण्यात येते. दहा दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते. पूजेमध्ये पाच प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज नऊ दिवस वेगवेगळी चढवली जाते. सकाळी संध्याकाळी धूप  दीप  आरती आणि देवीला नेवैद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. नऊ दिवस सतत या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो. कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते. नऊ कुमारिकांचे त्यांचे पाय धुऊन आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजन करण्यात येते. तर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात.
अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन करण्यात येतो. कोणतीही नजर लागली असेल अथवा वास्तूमध्ये कोणताही त्रास असेल तर होमहवन करून सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी पूजा करण्यात येते. नऊ दिवस भोंडला खेळून देवीचा जागरही केला जातो. दरम्यान काही ठिकाणी आरती झाल्यानंतर घागर फुंकणे हा विशेष कार्यक्रमही असतो. अष्टमीला हा कार्यक्रम योजला जातो. ही घागर त्यामध्ये उदाच्या धुपाने भरली जाते आणि पाच वेळा फुंकली जाते. यामुळे श्‍वसनमार्ग शुद्ध होतो असे समजण्यात येते.
नवरात्रौत्सवात देवीची ओटी भरणे हादेखील एक महत्त्वाचा भाग असतो. पण देवीची ओटी भरणे म्हणजे नक्‍की काय आहे आजकाल अनेक जणींना माहीत नसते. नवरात्रीच्या माहितीसह हीदेखील माहिती जाणून घ्या. देवीला या नऊ दिवसांमध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते. या धाग्यांमध्ये देवीकडून येणार्‍या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते. म्हणून ही प्रथा आहे. त्यामुळेच या दिवसात साडी नेसण्याला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये ही साडी, त्यावर खण आणि नारळ ठेऊन हाताची ओंजळ छातीच्या दिशेने असेल अशी ओटी भरावी. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने राहील याची काळजी घ्या. देवीकडून आपल्याला अधिकाधिका उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करण्यात येते. तांदूळ हे सर्वसमावेशक असतात. चैतन्य आणि चांगल्या लहरी शरीरापर्यंत पोहचविण्याचे काम करतात. म्हणूनच ओटीमध्ये तांदळाचाही समावेश करण्यात येतो.
नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरूध्द राक्षसांचे घनघोर युध्द आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुध्द दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा शीगणेशा या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.
या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युध्द करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी महत्त्व आहे. उत्तर भारतात या दिवशी रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपट्याच्या झाडामध्ये ठेवले होते असे मानतात. म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजाही करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button