गॅसवाहू टँकर नदीत कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग आंजणारी येथे 30 तासांहून अधिक काळ ठप्पच
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील आंजणारी नदीवरील पुलावरून काजळी नदीपात्रात कोसळलेल्या गॅसवाहू टँकरमुळे महामार्गावरील वाहतूक 30 तासांपेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आली आहे. अपघातग्रस्त गॅसवाहू टाकीतील गॅस सुरक्षितरित्या दुसर्या टाकीत काढल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले. 22 सप्टेंबर रोजी लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून गॅसवाहू टँकर नदीपात्रात कोसळल्याने संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात घडला होता. या अपघातात टँकरचा चालक जागीच ठार झाला होता. अपघातग्रस्त टँकर हा भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस वाहून नेणारा होता. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव सर्व यंत्रणांनी एकत्रित येत महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक ही देवधे पावस व देवधे काजरघाटीमार्गे वळण्यात आली होती. अन्य लांब पल्ल्याची वाहतूक दाभोळे संगमेश्वर चिपळूण आणि दाभोळे मलकापूरमार्गे वळविण्यात आली होती.शुक्रवारी सायंकाळपर्यंत पुणे व गोवा या ठिकाणाहून आलेल्या पथकांनी रिकाम्या गॅसवाहू टाकीत तांत्रिक टीमच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातील गॅस सुरक्षितरित्या काढण्याचा प्रयत्न सुरू होता.