लांजातून महिला बेपत्ता
लांजा : गणेशोत्सवासाठी सामान खरेदीसाठी आलेली महिला शहरातील कोत्रे हॉटेल समोरून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी दुपारी घडली होती. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात 12 सप्टेंबर रोजी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. लांजा तालुक्यातील हर्चे उभावाडा येथील नारायण यशवंत कुवार (50 वर्षे) यांनी याबाबतची फिर्याद लांजा पोलिस ठाण्यात केली आहे. नारायण कुवार हे मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी पत्नी नम्रता नारायण कुवार (45) हिच्यासह लांजा येथे आले होते. गणपती सणासाठी लागणारे साहित्य खरेदी केल्यानंतर पत्नीजवळ सामान ठेवून दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास ते आपण बाथरूमला जाऊन येतो असे सांगून गेले होते. त्यांची पत्नी लांजा शहरातील कोत्रे हॉटेलसमोर उभी होती. नारायण कुवार बाथरूमला जाऊन आले असता त्यांना पत्नी नम्रता आढळून आली नाही. त्या नंतर त्यांनी आजुबाजूला चौकशी केली. मात्र, पत्नीचा कोठेही ठावठिकाणा लागला नाही.