सुवर्णमहोत्सवी अलोरे प्रशालेच्या प्रतिनिधींनी ‘इंदोर’मध्ये घेतली आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची भेट

चिपळूण :: कोयना भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या अलोरेतील तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी कोयना बोगदे मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून १९६८ च्या पावसाळ्याच्या दिवसात डॉ. माधवराव चितळे यांची बदली तालुक्यातील अलोरे येथे झाली होती. १९७१ पर्यंत ते अलोरेत कार्यरत होते. याच काळात अलोरे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार चिपळूण शहरातील शाळा अलोरेत यावी म्हणून परशुराम एज्युकेशन सोसायटी या चिपळूणच्या शिक्षण संस्थेची शाळा अलोरेत सुरु करण्याचा निर्णय झाला होता. या निर्णय प्रक्रियेच्या प्राथमिक चर्चांत स्थानिक प्रकल्प अधिकारी म्हणून चितळे यांची भूमिका महत्वाची राहिली होती. अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (१९७२-२०२२) पार्श्वभूमीवर चितळे यांच्याकडील ‘अलोरे’तील आठवणी जाणून घेण्याच्या हेतूने प्रशालेच्या प्रतिनिधींनी मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथे नुकतीच डॉ. चितळे यांची भेट घेऊन संवाद साधला.*

महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करताना पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या’ स्टॉकहोम वॉटर प्राईझ’ (१९९३) ने सन्मानित शास्त्रज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचे नाव टाळून पुढे जाता येणार नाही, इतके महत्त्वाचे आहे. डॉ. चितळे यांचे चिपळूण तालुक्यातील अलोरेत शाळा येण्यासाठीचे योगदान लक्षात घेऊन विद्यमान मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, माजी मुख्याध्यापक आणि शाळा-संस्था समन्वयक अरुण माने, शाळेच्या १९९५ बॅचचे माजी विद्यार्थी पर्यावरणप्रेमी पत्रकार आणि लेखक धीरज वाटेकर या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मुख्याध्यापक वाचासिद्ध यांनी डॉ. चितळे यांना शाळेच्या वर्तमान उपक्रम आणि प्रगतीची माहिती दिली. डॉ. चितळे यांनी दहा वर्षांपूर्वी चिपळूणला झालेल्या चितळे कुल संमेलनप्रसंगी आवर्जून अलोरेत येऊन शाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांचे स्वागत अरुण माने सरांनी केल्याची आठवण त्यांना यावेळी सांगण्यात आली. धीरज वाटेकर यांनी डॉ. चितळे यांच्याशी अलोरे गाव, प्रकल्प आणि शाळा यांसह विस्तृत जलसंवाद साधला. या मुलाखतीतील हा विशेष संवाद शाळेच्या आगामी स्मरणिकेत एका शाळेच्या गोष्टीतील पूर्वपिठीकेत वाचता येईल.

चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे परशुराम एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल (१९६९) सुरू झाले होते. एम.एस.ई.बी.तील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शाळेची सोय झालेली होती. या पार्श्वभूमीवर अलोरे प्रकल्पात राहाणाऱ्या व वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत रहावे म्हणून प्रकल्पाच्या वसाहतीत दर्जेदार माध्यमिक शाळेची गरज होती. अलोरे शाळेच्या निवडीबाबत खूप चर्चा झाली होती. अंतिमत: प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या, ‘चिपळूण शहरातील शाळा अलोरेत यावी’ या मागणीनुसार परशुराम एज्युकेशन सोसायटीची शाळा अलोरेत आणण्यात आली होती. पुढील कालखंडात रत्नागिरी जिल्ह्यात याच अलोरे शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली. चितळे यांच्या प्रोत्साहनाने अलोरेत आठवडा बाजार सुरु झाला होता. अलोरे बालकमंदिर, टपालघर आदी सुविधा याच काळात सुरु झाल्या. चितळे आणि त्यांचे सर्व सहकारी अभियंते, कर्मचारी आदींच्या पुढाकारातून गणेशोत्सव, महिला मंडळ उपक्रमांमधून वसाहतीचा सांस्कृतिक विकास झाला होता. भयग्रस्त कर्मचाऱ्यांची कामाची मानसिकता तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यासह डॉ. चितळे स्वतः अपुऱ्या व्यवस्थेत काहीकाळ अलोरेत राहिले होते. कर्मचाऱ्यांचा विमा उतरवणे, अनुदानाच्या खर्चातील एक टक्का रकमेतून कर्मचाऱ्यांना वसाहतीतील खोल्या रंगविण्यासाठी रंग उपलब्ध करून देण्यात आले होते. कर्मचाऱ्यांची कामाविषयी निष्ठा निर्माण होण्यात या सर्वांचा उपयोग झाला होता. त्याकाळी अलोरे वसाहतीत साप खूप दिसत. सर्पांना भूकंपाचे धक्के चटकन जाणवतात याचा विचार करून अलोरे वसाहतीच्या शेजारून अर्धामीटर रुंदीचा वाळूचा थर देण्यात आला होता.

११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी कोयना धरण परिसरात ६.७ रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप झाला होता. या भूकंपामुळे लगतच्या चिपळूण आणि पाटण तालुक्यात मनुष्यहानी आणि खूप नुकसान झाले होते. अशा स्थितीत डॉ. चितळे यांची अलोरेत बदली झाली होती. १९६८ ते १९७१ ते अलोरेत कार्यरत होते. १९७१-७२चे शालेय सत्र सुरु असताना त्यांची मुंबईत बदली झाली. मुळा, भातसा, कोयना आदी प्रकल्पांवरील परिस्थिती गुंतागुंतीची आणि अडचणीची असताना तिथे चितळे यांची नेमणूक होताच कोणतीही सबब न सांगता ते त्या पदावर रूजू झाले होते. आपल्या कारकिर्दीत चितळे यांनी अनेक अवघड कामे स्वीकारली आणि यशस्वी करून दाखवली. अलोरे संदर्भात, ‘ठेकेदारांकडील कामांची फेरजुळवणी करण्यातील वित्तीय व कायदेशीर अडचणींमधून मार्ग काढणे, प्रकल्पाची काही कामे ताब्यात घेवून खात्यामार्फत यंत्रे व मजूर लावून करवून घेणे, प्रकल्पाच्या वसाहतींची फेरबांधणी व विस्तार करणे, तेथील सामाजिक जीवनात उत्साह निर्माण करणे’ अशा प्रकारे प्रकल्प सुरळीतपणे मार्गस्थ करण्याचे जे काम त्यांच्या कारकिर्दीत झाले त्याची ‘उत्कृष्ट’ म्हणून गणना झाली. शासनाने मंत्रालयातील एका कार्यक्रमात डॉ. चितळे यांना खात्याचे तत्कालीन सचिव भुजंगराव कुलकर्णी यांच्या हस्ते व सहीने या कामांसाठी दोन पानी सविस्तर गुणवत्ता प्रशस्तिपत्र बहाल केले होते. विशेष म्हणजे त्या काळात अशाप्रकारे औपचारिक गुणवत्ता प्रशस्तिपत्र देण्याची पध्दत प्रशासनात रूढ नव्हती. चितळे यांना मिळालेले ते अशा प्रकारचे पहिले गौरवपत्र होते. कालांतराने शासनाने दरवर्षीच्या कामांचा आढावा घेवून गुणवत्ता प्रशस्तिपत्रके देण्याचा व गुणवंतांचा समारंभीय सत्कार करण्याचा चांगला पायंडा पाडला होता.

याच भेटीत डॉ. चितळे यांच्याशी ‘जलसंवाद’ साधण्यात आला. शालेय अभ्यासक्रमातील भूगोल हा विषय पावसाची ‘दोलायमानता’ सारख्या विचाराशी जोडला जायला हवा. हे शिकवले न गेल्याने पाण्याच्या व्यवस्थापनाचे पुरेसे गांभीर्य आपल्याकडे रुजले नसल्याचे सांगताना चितळे यांनी ‘पाणी’ या विषयातील अनेक मुद्यांचा उहापोह केला.यावेळी डॉ. चितळे यांच्या पत्नी आणि ‘सुवर्णकिरणे’ या आत्मचरित्राच्या लेखिका सौ. विजया चितळे, डॉ. चितळे यांचे इंदोर येथील जावई आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गिरीश कवठेकर, अलोरेतील बालक मंदिरात शिकलेल्या कन्या आणि विद्यमान प्रसिद्ध डेंटल सर्जन वृंदा कवठेकर यांच्याशीही संवाद साधण्यात आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button