
चिपळूण-संगमेश्वरमधील शिवसेनेला पडणार खिंडार; माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिनी अनेक कार्यकर्ते जाणार शिंदे गटात
चिपळूण : चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खरा राजकीय भूकंप हा 23 सप्टेंबरला होणार आहे. शिवसेनेचे अनेक दिग्गज कार्यकर्ते माजी आमदार यांच्या समर्थनार्थ शिंदे गटात सहभागी होऊन माजी आमदार सदानंद चव्हाण यांना भेट देणार आहेत, असे खात्रीलायक कळते. २३ सप्टेंबरला माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा वाढदिवस आहे. सदानंद चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले.
चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठींबा दिला. ही भेट म्हणजे चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेशच समजला जात आहे. मात्र माजी आमदार सदानंद चव्हाण हे आपल्या समर्थकांना घेत शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेला हादरा देणार आहेत. सदानंद चव्हाण यांचा चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात मोठा चाहता वर्ग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आल्यावर ते चिपळूण आणि संगमेश्वर भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. २३ सप्टेंबरला माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा वाढदिवस आहे. याच दिवशी चिपळूण आणि संगमेश्वरमधील कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होऊन माजी आमदार सदानंद चव्हाण यांना भेट देणार आहेत.