रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या किनार्यावरील 935 सीआरझेड क्षेत्रातील बांधकामे अडचणीत
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट कारवाई प्रकरणामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील अलिबाग ते सिंधुदुर्ग किनार्यावर 935 सीआरझेड क्षेत्रात असलेली बांधकामे अडचणीत येण्याची शक्यता आहे. परंतु आमचा विषय फक्त साई रिसॉर्ट प्रकरणाशी असून स्थानिक व्यावसायिक यांची बांधकामे तुटणार नाहीत, असे मत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली येथे व्यक्त केले. याच मुरुड क्षेत्रातील 35 प्रकरणांचे बिनशेती परवाने अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी रद्द केल्याने येथील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनारा हा पर्यटनदृष्ट्या सुरक्षित किनारा मानला जातो. येथे दरवर्षी अनेक पर्यटक भेटी देतात. त्यातून येथील हॉटेल आणि निवास असा व्यवसाय होऊन कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र, या दोन वर्षात येथे येण्याचा पर्यटकांचा ओघ मंदावला आहे. पर्यटन क्षेत्राकडे सतत धावणारी पर्यटकांची वाहने कमी होत चालली आहेत.