चिपळूणमधील एटीएम फोडणार्‍यांच्या गोव्यातून आवळल्या मुसक्या

चिपळूण : शहरातील भोगाळे परिसरातील युनियन बँकेचे एटीएम  फोडून 14  लाख 60 हजार 500 रुपयांची रक्कम लांबवणार्‍या टोळीतील तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. 24 तासांच्या आत गोव्यातून त्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीतील 4 लाख 5 हजार 290 रुपये, इन्होव्हा गाडी, तीन महागडे मोबाईल असा एकूण 14 लाख 85 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील संशयितांचे अन्य 2 साथीदार फरार असून चोरीची उर्वरित रक्कम लवकरच हस्तगत करण्यात येणार असल्याची आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इरफान आयुब खान (वय 39, मूळ रा. उत्तर प्रदेश सध्या रा. कलिना मुंबई), वासिफ साबिर अली (25, मुळ रा.उत्तर प्रदेश सध्या रा.मुंबई) आणि शादाब मकसुद शेख (35, मूळ रा.उत्तर प्रदेश, सध्या रा. सांताक्रूज, मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघांनी 31 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते 4.30 वा. कालावधीत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरी केली होती. घटनेनंतर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील 7 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 1 पोलिस उपनिरीक्षक आणि अनेक अनुभवी व निवडक पोलिस अंमलदार यांची 12 पथके तयार केली. यात अंगुली मुद्रा, डॉग स्कॉड तसेच तांत्रिक विश्लेषण शाखा (टॅब) अशा कौशल्य असणार्‍या पोलिसांचाही समावेश होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजापूर पोलिस ठाणे यांच्या संयुक्त पथकाला या गुन्ह्यांतील संशयित गोव्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या पथकांनी गोव्याला जाऊन संशयितांना ताब्यात घेत 24 तासांत हा गुन्हा उघकीस आणला. संशयितांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी यापूर्वी रेकी करून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. या गुन्ह्याचा अधिक तपास चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी करत आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग  यांच्या  मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, डॉ. सचिन बारी, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, रवींद्र शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, सुजिद गडदे, रत्नदीप साळोखे, मनोज भोसले, तुषार पाचपुते, संदीप पाटील, अमोल गोरे, पोलिस उपनिरीक्षक शाम आरमाळकर आणि या पथकांमध्ये असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सहायक पोलिस फौजदार संजय कांबळे, पोलिस हवालदार विजय आंबेकर, सागर साळवी, बाळू पालकर, प्रवीण खांबे, मनोज जाधव, वृशाल शेटकर, संदीप मानके, महिला पोलिस हवालदार वेदा मोरे, पोलिस नाईक सत्यजित दरेकर, रमीज शेख, योगेश नार्वेकर, वैभव नार्वेकर, मनोज लिंगायत, रोशन पवार, उत्तम इंपाळ, करण देसाई, चालक पोलिस नाईक दत्तात्रय कांबळे, पोलिस शिपाई नीलेश शेलार, कृष्णा दराडे, प्रमोद कदम, गणेश पाडवी, अजय कडू, रुपेश जोगी, वैभव ओहोळ, गणेश शिंदे व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातील अनेक पोलिस अंमलदारांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button