
भाट्ये येथील अक्षय पिलणकरच्या कलाकृतीला केंद्रीय नारळ बोर्डाचा पुरस्कार
रत्नागिरी : भाट्ये येथील अक्षय पिलणकर याने नारळावर कोरलेल्या गणपतीपुळे येथील श्री गणरायाच्या कलाकृतीला केंद्रीय नारळ बोर्डाचा ‘सर्वोत्तम कलाकृती’चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 2 सप्टेंबर रोजी केरळ कोची येथे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते दिला जाणार आहे. केरळ-कोची येथील केंद्रीय नारळ विकास मंडळाच्यावतीने नारळ उत्पादक, शेतकरी आणि कारागीर (कलाकृती) यांच्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अक्षयने नारळावर कोरलेली गणपतीपुळे येथील श्री गणेशाची मूर्ती सर्वोत्कृष्ट ठरली. संपूर्ण देशातून आलेल्या कलाकृतींमधून अक्षयच्या कलाकृतीला हा सन्मान मिळाला. केंद्रीय नारळ विकास मंडळाचे सचिव आर. मधू यांनी पत्राद्वारे अक्षय याचे अभिनंदन करून कोची येथे होणार्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. अक्षयला लहानपणापासूनच चित्रकला, हस्तकला, मूर्तीकला याची आवड आहे. भाट्ये येथील प्रसिद्ध गणेशमूर्तीकार कै.परमानंद पिलणकर यांचा अक्षय हा पूत्र असून त्यांनाही सन 2010 साली केंद्रीय नारळ बोर्डाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.