पोटनिवडणुकीत समोर या… तुमचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत : खासदार राऊत यांचे ना. सामंतांना आव्हान
राष्ट्रवादीला फसवून शिवसेनेत आले. उद्धवजींनी पूर्ण विश्वास दाखवला. पण त्यांच्याही तोंडाला पाने पुसून गेले. आता खरंच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पोटनिवडणुकीत समोर या… तुमचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. अशा शब्दात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना थेट आव्हानच दिले. संगमेश्वर खाडी विभागाच्या शिवसेना पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, लोकसभा महिला संपर्क प्रमुख नेहा माने, जिल्हा महिला संघटक वेदा फडके, उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, मंगेश साळवी, संजय पूनसकर, माजी सभापती सुजित महाडिक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी, सरपंच तसेच खाडी विभागातील निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. रत्नागिरी मतदारसंघ हा ठेकेदारांची मालमत्ता नाही. तर निष्ठावंत शिवसैनिकांचा व सामान्य मतदारांचा अभेद्य गड आहे. जेव्हा गरज पूर्ण होईल, त्यावेळी भाजप यांना हाकलून देणार आहे. हे येत्या काळात स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. खा.राऊत यांनी यावेळी भाजपवर देखील टीका केली. स्मशानातील लाकडे आणि मयतच्या साहित्यावर जीएसटी लावण्याचा क्रूर नतद्रष्टपणा केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. महागाई गगनाला भिडली आहे. खाद्यतेल, पेट्रोल, गॅसच्या किमती दररोज वाढत आहेत. परंतु त्याकडे लक्ष द्यायचे नाही. त्यांचे लक्ष फक्त सरकार पाडायचे, आमदार फोडायचे आणि आपले सरकार आणायचे याकडेच आहे. यावेळी संपर्कप्रमुख सुधीर मोरे तसेच सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी फुणगूस मुस्लिम मोहल्ल्यातील तबससुम इलियास खान यांनी आपल्या सहकारी महिलांसह शिवसेनेत प्रवेश केला. नेहा माने, वेदा फडके यांनी भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सेनेत स्वागत केले.