कोयना प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरूच; दोघांची प्रकृती खालावली
चिपळूण : कोयना वीज प्रकल्पग्रस्तांचे तिसर्या दिवशीही पोफळी येथील महाजनको कार्यालयासमोर उपोषण सुरू होतेे. शासन जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यासाठी निर्णय घेत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे. शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या पुढाकाराने कोयना वीज प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरू आहे. कोयना वीज प्रकल्पाच्या उभारणीनंतर काही काळ प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यात आले. मात्र, 2017 नंतर शासनाने निर्णय बदलून प्रकल्पग्रस्तांचे प्रशिक्षण तसेच प्रकल्पात नोकरीत सामावून घेणे बंद केले. त्यामुळे या निर्णयाविरोधात अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, यश आले नाही. अखेर प्रकल्पग्रस्तांनी 14 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. 15 ऑगस्ट रोजी उपोषण स्थगित करून पुन्हा 16 रोजी उपोषण सुरू झाले. उपोषणाला बसलेल्या मिलिंद मोहिते व रूपेश मरगज यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शिरगाव प्राथमिक आरोग्य केंंद्रात दाखल करण्यात आले आहे.