चिपळूण नगर परिषदेच्या रंगरंगोटीसाठी लागणार 21 लाख रुपये; काम थांबवण्याची मागणी

0
38

चिपळूण : धोकादायक असलेल्या नगर परिषदेच्या इमारतीचे 21 लाख रूपये खर्च करून सुरू असलेले रंगरंगोटीचे काम तातडीने थांबवावे अथवा रद्द करावे, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी एका पत्राद्वारे मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे. मुकादम यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिलेल्या पत्रानुसार, तत्कालीन सभागृहाने इमारतीच्या रंगरंगोटीसाठी खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र, सभागृहाने दिलेल्या मंजुरीचा फायदा घेऊन 21 लाख रूपये रंगरंगोटीवर अनाठायी खर्च करण्यात येत आहेत. व्यावहारिकदृष्ट्या न.प.चे हे आर्थिक नुकसान आहे. संबंधित रंगरंगोटी करण्यात येणारी इमारत ही धोकादायक असल्याचे व वापरास योग्य नसल्याचे नगररचना अधिकार्‍यांनी मत नोंदविले आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनेनुसार इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट अद्यापही करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे नवीन इमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव अंतीम टप्प्यात आहे. शासनमान्यता व निधीची तरतूद आहे. असे असताना जुन्या व धोकादायक इमारतीवर केवळ रंगरंगोटीसाठी 21 लाख रूपयांचा खर्च करणे व्यवहार्य नाही. त्यामुळे हे काम तत्काळ स्थगित अथवा रद्द करावे, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here