रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे कामाला नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या कोल्हापूर जिल्ह्यातील 79 कि.मी.च्या कामाला नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ होणार आहे.महामार्गाचे प्रकल्प संचालक पी. डी.पंदारकर यांनी बुधवारी ही माहिती दिली. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच जमिनीचा प्रत्यक्ष ताबा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दिला जाणार असून, सध्या दुसर्या टप्प्यातील भूसंपादनाचे काम सुरू आहे.
रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले या चार तालुक्यांतून जाणार आहे. आंबा ते चोकाकपर्यंत 79 कि.मी.च्या या मार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, मार्गासाठी आवश्यक जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण केली जाणार आहे. रस्त्याचा आराखडा तयार असून, जमीन ताब्यात मिळाल्यानंतर प्राथमिक कामाला तत्काळ सुरुवात होईल. त्यानंतर प्रत्यक्ष रस्ता बांधणीचे काम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा 79 कि.मी.चा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा रस्ता हा 45 मीटर रुंद राहणार आहे. हा रस्ता चौपदरी असून, दोन्ही बाजूंना दोन लेन (मार्गिका) असतील. सध्याच्या कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा ते केर्लेपर्यंत मूळ मार्गाचे रुंदीकरण होणार आहे. यानंतर हा मार्गकेर्ले-भुये-शिये-हेर्ले-चोकाकमार्गे कोल्हापूर-सांगली रस्त्याला जोडला जाणार आहे.
www.konkantoday.com