तुळसवडे सरपंचांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी; उपसरपंच यांनी दिले आव्हान

0
27

राजापूर : तुळसवडे गावच्या सरपंच सुप्रिया आडिवरेकर या भाजप पुरस्कृत गावविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडून आलेल्या आहेत. मात्र, त्यांनी गावविकास पॅनेलची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत सदस्य पदासह सरपंचपदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी, असे आव्हान तुळसवडेचे उपसरपंच संजय कपाळे यांनी सरपंच सुप्रिया आडिवरेकर यांना दिले आहे.
सात सदस्य संख्या असलेल्या तुळसवडे-सोलिवडे ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत गावविकास पॅनेलचे वर्चस्व होते. सातपैकी चार सदस्य गावविकास पॅनेलचे असून त्यामध्ये सरपंच आडिवरेकर यांचा समावेश होता. मात्र, सरपंच आडिवरेकर यांनी शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशातून शिवसेनेची ताकद वाढताना भाजपला राजकीयदृष्ट्या धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर उपसरपंच कपाळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गावविकास पॅनेलच्या उमेदवार म्हणून लोकांनी आडिवरेकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले होेते. मात्र, त्यांनी भाजप पुरस्कृत गावविकास पॅनेलची साथ सोडून शिवसेनेला साथ दिली आहे.
या पक्षप्रवेशाद्वारे त्यांनी लोकांना विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत सदस्यपदासह सरपंचपदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवावी असे आव्हान कपाळे यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here