कोंबड्यांच्या वासाने बिबट्या शिरला घरात… कुटुंबियांनी एकत्र येत दरवाजाला लावली कडी…अन्यथा

0
32

राजापूर : तालुक्यातील गोठणे-दोनिवडे हातणकरवाडी परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून गुरूवारी सायंकाळी ७.१५ वाजता या बिबट्याने दीपक साखरकर यांच्या घरातच थेट प्रवेश केला. घाबरून गेलेल्या साखरकर कुटुंबीयांनी घरातील एका खोलीत एकत्र येऊन कडी लावून घेतल्याने गंभीर अनर्थ टळला आहे. बिबट्या घरात शिरल्यानंतर आरडाओरड केल्याने काही वेळात या बिबट्या घरातून निघून गेला. यानंतर साखरकर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या घटनेमुळे या परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गोठणे-दोनिवडे हातणकरवाडी परिसरात गेले काही दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. अगदी भर दिवसाही ग्रामस्थांना याचे दर्शन होत आहे. वाडीतील काही कुत्रीही या बिबट्याने फस्त केली आहेत.
गुरूवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या दरम्यान हा बिबट्या दीपक साखरकर यांच्या घराच्या पडवीतील कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला. तेथून तो घराचे दार उघडे असल्याने थेट घरात शिरला. यावेळी धनलक्ष्मी साखरकर यांनी त्याला पाहिले व त्या घाबरून गेल्या. लगेचच त्यांनी घरातील सगळ्यांना एका खोलीत कोंडून घेतले व आतून कडी लावली आणि आरडाओरड केली. दरम्यान लगतच्या ग्रामस्थांनीही साखरकर यांच्या घराकडे धाव घेतली व आरडोओरड केली. या आरडा-ओरडीनंतर हा बिबट्या घरातून पळून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. साखरकर कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
या घटनेबाबत महेश नकाशे यांनी तत्काळ राजापूर तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तहसीलदार शितल जाधव व निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली व घटनास्थळी तत्काळ रवाना होण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने राजापूर वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी आपल्या टिमसह या ठिकाणी पोहोचले व पाहणी केली. गोठणे-दोनिवडे सरपंच मुकेश विचारे, माजी सरपंच अशोक साखरकर यांनी साखरकर कुटुंबियांची भेट घेतली. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here