साखरपा येथे विजेचा शॉक देऊन मासेमारी करणारा शॉक लागून जखमी

0
24

संगमेश्वर : तालुक्यातील साखरप्यातील कोंडगाव खालची शिंदेवाडी येथील पर्‍यात मासे पकडताना वापरण्यात आलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने एकजण जखमी झाला. त्याच्या बोटांना दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पर्‍यावर परिसरातील महिला कपडे धुण्यासाठी तसेच गुरे पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे यापुढे अशी विद्युतप्रवाहाने मासेमारी करण्याचे प्रकार होऊ नयेत याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.
विजेच्या धक्क्याने जखमी झालेला तरुण घरातून विद्युतभारीत वायर पर्‍यापर्यंत आणून मासेमारी करत होता. पर्‍याच्या पाण्यात या विद्युतभारीत प्रवाहाने मृत होणारे मासे जमा करत होता.
गेल्या बुधवारी ही मासेमारी करत असताना मृत झालेले मासे पाण्यातून गोळा करत होता. विद्युतभारित वायरचे बटण बंद करण्यास विसरला. त्यामुळे त्याला विजेचा झटका बसून दोन बोटांना दुखापत झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. विजेचा धक्‍का बसल्यानंतर त्या तरुणाने वाचवा वाचवा अशी हाक दिली.
शेजारीच काम करणाऱ्यानी लगेचच घरात धाव घेऊन विद्युतभारित वायरचे बटण बंद केले. जखमी झालेल्या तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. आता त्या तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here