मागील अडीच वर्षात शिवसेनेने विश्‍वासात घेतले नाही… माजी आमदार म्हणून विकासनिधीही दिला नाही : सदानंद चव्हाण

0
43

चिपळूण : मागील अडीच वर्षात शिवसेना पक्षाने आपल्याला विश्‍वासात घेतले नाही. माजी आमदार म्हणून विकास निधी दिला नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचे? आजच्या बैठकीमध्ये आ. भास्कर जाधव यांचा सत्कार झाला. मात्र, आपल्याला तो सन्मान मिळाला नाही. असे असेल तर कसे करायचे? असा प्रश्‍न शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिवसेनेच्या बैठकीत विचारला.
चिपळूण शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, गुहागर विधानसभा क्षेत्र तालुकाप्रमुख संदीप सावंत, शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी चिपळूण तालुका शिवसेनेची बैठक बोलावली होती. शहरातील अतिथी सभागृहात शुक्रवारी (दि.5) सकाळी ही बैठक झाली. यावेळी आ. भास्कर जाधव, माजी आ. सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, राजू देवळेकर, माजी सभापती बळीराम शिंदे, शिवसेना पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, माजी जि. प., पं. स. सदस्य, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी मनातील सल बोलून दाखविली. कार्यकर्त्यांनी पक्षासाठी वाट्टेल ते काम केले. मात्र, सत्ता असताना देखील कार्यकर्त्यांना जपण्याचे काम केले नाही. विकासकामे झाली नाहीत, अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी, आता आघाडी नको. शिवसेनेने स्वतंत्र आणि स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका मांडली. यानंतर आ. भास्कर जाधव यांनी चिपळूणचे नेतृत्व घ्यावे आणि सर्वांनी एकत्र येऊन संघटना बांधावी अशा भावना व्यक्‍त केल्या.
यावेळी बोलताना आ. भास्कर जाधव यांनी, पक्षातील बंडाळीचा समाचार घेतला आणि सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांना साथ देऊया. पक्षासाठी आजवर आपण सर्वांशी लढलो. मात्र, आता संघटनेसाठी काम करण्याची वेळ आली आहे असे सांगितले. पक्षाची ही बैठक होती. मग, सत्कार समारंभ कसला? प्रस्तावनेत या बाबत तालुकाप्रमुखांनी स्पष्ट करायला हवे होते अशा शब्दांत भावना व्यक्‍त केल्या. अखेर तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी, ही शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक होती. सत्कार समारंभ नव्हता असा खुलासा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here