भोस्ते घाटात मालवाहू ट्रक उलटला चालक क्लीनर दोघेही जखमी

0
42

खेड वार्ताहर : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर होत असलेलया अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नाही. आज सकाळी घाट उतरत असताना या अवघड वळणावर आणखी एक मालवाहू ट्रक उलटला. या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही जखमी झाले आहेत. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्हातील कागल येथून दगडी कोळसा भरून महाड औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी निघालेले ट्रक सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील भोस्ते घाटात आला. भोस्ते घाट उतरत असताना ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाच्या हे लक्षात आल्यावर त्याने तीव्र उतारावर असलेला ट्रक नियंत्रित करण्याच्या प्रयत्न केला मात्र अचानक समोर अवघड वळण आल्याने चालकाचे प्रयत्न अपुरे पडले आणि तो ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला.
या अपघातात ट्रक चालकाच्या डोक्याला तर क्लीनरच्या पायाला मार लागून दोघेही जखमी आले. जखमी चालकाला तात्काळ नजीकच्या कळंबणी उजाळा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले
गेल्या काही दिवसात भोस्ते घडतात त्या अवघड वळणावर वारंवार अपघात होत आहेत. या मध्ये एका ट्रक चालकाचा जीव देखील गेला आहे तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. घाटातील त्या अवघड वळणाचे काम योग्य प्रकारे न झाल्याने या वळणावर वारंवार अपघात होत आहेत मात्र ठेकेदार कंपनी किंवा महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही.
भोस्ते घाटातील त्या अवघड वळणांवर वारंवार अपघात होऊ लागल्यानंतर या ठिकाणी मोठमोठे स्पीड ब्रेकर्स टाकण्यात आले. यामुळे वाहनाचा स्पीड कमी होऊन अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा होती. मात्र स्पीड ब्रेकर्समुळे अपघात कमी होण्याऐवजी स्पीड ब्रेकर्स वरून उडाल्याने वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भोस्ते घाटातील त्या अवघड वळणाजवळील स्पीड ब्रेकर्स अपघाताचे कारण ठरू लागले आहेत.

भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेत महामार्ग बांधकाम वि विभागाने या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here