
रत्नागिरी जिल्ह्यातील 12 हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
रत्नागिरी : पूर्व माध्यमिक पाचवी आणि उच्च माध्यमिक आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. पाचवीसाठी 8 हजार 158 विद्यार्थी तर आठवीसाठी 4 हजार 10 विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. दोन्ही मिळून 531 विद्यार्थी अनुपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षांची तारीख मागीलवेळी बदलण्यात आली होती. जिल्ह्यात विविध केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून प्रत्येक केंद्रावर नियोजन केले होते. शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नियोजन करण्यात आले होते. परीक्षांसाठी 139 केंद्र निवडण्यात आली होती. पहिला पेपर सकाळी 11 ते 12.30 तर दुसरा पेपर 1.30 ते 3 असा होता. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा केंद्रावर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पाचवीसाठी नोंदणी केलेल्या 4 हजार 193 पैकी परीक्षा देणार्यांमध्ये 2 हजार 996 मराठी माध्यम, 285 उर्दू आणि 729 इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी होते. आठवीमध्ये नोंदणीकृत 8 हजार 506 विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष परीक्षेला बसलेल्यांमध्ये 6 हजार 724 मराठी, 408 उर्दू आणि 926 इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी होते.