
बेनी येथे पुलाच्या लोखंडी प्लेट चोरीप्रकरणी दोघे अटकेत
लांजा : शहरानजीकच्या धनावडे स्टॉप येथील बेनी नदीवरील पुलाच्या लोखंडी प्लेट चोरी करण्यासाठी आलेल्या दोघा चोरट्यांना लांजा पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. ही घटना दि. 31 जुलै रोजी रात्री घडली आहे. या घटनेत लांजा पोलिसांनी एक तवेरा आणि एक बोलेरो अशा दोन कारसह दोन मोबाईल असा एकूण 6 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवधे धनावडे स्टॉप येथे बेनी नदीवर पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामासाठी लागणार्या लोखंडी प्लेट चोरण्याचा या चोरट्यांचा मनोदय होता. या घटनेतील संशयित आरोपी अशोक नामदेव चौगुले (वय 25 रा. हिंगणगाव, तालुका कवठे महाकाळ, जिल्हा सांगली) आणि अतुल आदिकराव महाडिक (वय 26, राहणार शिवाजी चौक, मराठी शाळेजवळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) अशी दोघांची नावे आहेत. लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी लांजा न्यायालयासमोर सोमवारी उभे केले असता न्यायालयाने त्यांना 4 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.