सर्वसाधारण महिला गटांमध्ये सोडत काढताना सावळागोंधळ
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या 62 जागांसाठी गुरुवारी स्वा. सावरकर नाट्यगृहात सोडत झाली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवडणूक अधिकारी तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पूजा पाष्टे या छोट्या मुलीने आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या. निवडणूक विभागाकडून आलेल्या सूचनांनुसार आरक्षण जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. सर्वसाधारण महिला गटांमध्ये सोडत काढताना काहीसा सावळागोंधळ दिसून आला. गतवर्षी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणारे दोन गट यावेळी पुन्हा महिला राखीव करण्यात आले. यावेळी कोकरे गटाचे आरक्षण गतवेळी सर्वसाधारण महिला असतानाही यावेळी पुन्हा महिला काढण्यात आल्याचा आक्षेप संतोष चव्हाण यांनी घेतला होता. उमरोली गटाबाबतही तीच सूचना काहींनी केली. दोन्ही सूचनांची उलट तपासणी जिल्हाधिकारी पाटील यांनी तत्काळ केली. त्यात दोन्ही आक्षेप ग्राह्य असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हे आरक्षण बदलण्यात आले. आरक्षणाविषयीच्या हरकती पुढील तीन दिवसांमध्ये जिल्हाधिकार्यांकडे द्यावयाच्या आहेत.