तीन हजार रुपयांची लाच घेणार्या परुळेच्या ग्रामसेवकाला अटक
राजापूर : राहत्या घराच्या अॅसेसमेंटवरील आजोबांचे नाव बदलून तेथे वडिलांचे नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणार्या राजापूर तालुक्यातील परुळे गावचे ग्रामसेवक संजय बबन दळवी (वय 41) यांना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पाचल येथे रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे तालुक्यातील परुळे गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या घराचा अॅसेसमेंट उतारा आजोबांच्या नावावर होता. तो तक्रारदार यांना वडिलांच्या नावावर करायचा होता. या प्रकरणी तक्रारदार यांनी परुळे गावचे ग्रामसेवक संजय दळवी यांच्याकडे तशी विनंती केली होती. मात्र, यासाठी संबंधित ग्रामसेवक दळवी यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. 14 जुलैला रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून आपली तक्रार दिली होती.
या प्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण ताटे पोलिस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे दि. 27 जुलैला तक्रारदार यांच्या पाचल बाजारपेठेतील कार्यालयात संबंधित ग्रामसेवक दळवी यांनी जाऊन तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारली होती व नंतर ते पाचलमधील नारकरवाडीतील घरी गेले होते. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी संबंधित ग्रामसेवक संजय दळवी यांच्या घरी जाऊन पंचांसमक्ष त्यांना रंगेहाथ पकडले.