रत्नागिरी शहरातील खड्डे बुजवण्यास प्रारंभ
मनसे आणि भाजपच्या पाठपुराव्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि चर बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या ठेकेदारांनी रस्त्यांचे डांबरीकरण केले त्या ठेकेदारांकडून देखभाल दुरूस्ती अंतर्गत खड्डे आणि चर बुजवण्याचे काम करून घेतले जात असल्याचे रत्नागिरी नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता यतीराज जाधव यांनी सांगितले. पावसाळी डांबर, खडी, ग्रीटने हे काम होत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस अंतिम टप्प्यात आल्यानंतर नादुरूस्त रस्त्यांवर कार्पेट थर टाकला जाणार असल्याचेही अभियंत्यानी सांगितले.
जून महिन्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांपूर्वीच डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले. नवीन नळपाणी योजनेतील अंतर्गत वितरण जलवाहिनी टाकताना रस्त्यांमध्ये चर खोदण्यात आले. जलवाहिनी टाकल्यानंतर मात्र त्यावर योग्यरित्या भराव न टाकला गेल्याने पावसामुळे आणि वाहनांच्या रहदारीमुळे रस्ता खचून त्याठिकाणी खड्डे पडत गेले. रनपने जसा पाऊस कमी होईल तसे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते.
नागरिकांची ओरड होऊ लागल्यानंतर मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन देवून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम पंधरा दिवसात सुरू न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर पाठोपाठ भाजपचे शहर अध्यक्ष सचिन करमरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याच मागणीसाठी मुख्याधिकार्यांना निवेदन दिले. त्यावेळी मुख्याधिकार्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्याना सूचना करून डांबरीकरण केलेल्या ठेकेदारांना देखभाल दुरूस्ती अंतर्गत खड्डे आणि चर बुजवून घेण्यास सांगितले. त्यानुसार गेल्या शुक्रवारपासून खड्डे आणि चर बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. डांबरीकरण झाल्यानंतर पुढील दोन वर्षे त्या रस्त्यांची देखभाल दुरूस्ती संबंधीत ठेकेदाराने करण्याची तरतूद आहे.