जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवण्याची वेळ

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांची संख्या कमी असतानाच भूलतज्ज्ञ वेळीच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवण्याची वेळ रुग्णालयावर आली आहे. ऑपरेशनसाठी डॉक्टर असतानाही सोमवारी सिझेरियनसाठी आलेल्या एका महिलेला ऑपरेशन कक्षातच ताटकळत थांबावे लागल्याचा प्रकार पुढे आला. सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींनी जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता होऊ लागली आहेत. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरुपी भुलतज्ज्ञाचा विषय कायम चर्चेत राहिला आहे. प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञांची आवश्यकता असते. जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून प्रसुतीसाठी महिला दाखल होत असतात. अनेकवेळा कोणत्याही क्षणी त्यांना सिझरसाठी घ्यावे लागते. त्यामुळे येथे 24 तास भुलतज्ज्ञ उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे. मात्र जिल्हा रुग्णालयात केवळ एकच भूलतज्ज्ञ उपलब्ध आहे. त्यामुळे काही वेळा चिपळूण येथील रुग्णालयातून भूलतज्ज्ञ बोलावून घेतला जातो. मात्र नियमित होणार्‍या सिझर व अन्य शस्त्रक्रिया पहाता भुलतज्ज्ञांना वेळ अपुरा पडत आहे.
काही वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरातील डॉक्टरांना खासगी शस्त्रक्रियेसाठी तात्पुत्या स्वरुपात निमंत्रित केले जात होते. प्रत्येक शस्त्रक्रियेचा मोबदला त्यांना दिला जात होता. मात्र आता खासगी भुलतज्ज्ञांनी जिल्हा रुग्णालयाकडे पूर्णत: पाठ फिरवली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणूनही हे खासगी भूलतज्ज्ञ शासकीय रुग्णालयाला वेळ देत नसल्याची खंत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button