आंबव पोंक्षे येथे लाल चिखलात रंगली लावणी
संगमेश्वर : तरुणांना शेतीकडे वळविण्याच्या प्रयत्नातूनच नांगरणी आणि भातलावणीची आगळीवेगळी स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबव पोंक्षे गावात रंगली. या भात लावणी कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकरी संघटना ग्रामस्थ मंडळाकडून शनिवारी येथे सामूहिक नांगरणी व भात लावणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धांना खर्या अर्थाने सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी प्रेरणा दिली. नांगरी लोकांचे जेवण, बैलांना खाण्यासाठी चारा, प्रोत्साहनपर बक्षिसे देत या सामूहिक लावणीला वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. एकर, दोन एकर क्षेत्रात शेकडो लोक जमा झाल्याने भर पावसाळ्यात परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. चल माझ्या राजा चल रं सर्जा, लिंगोबाचा डोंगुर अशी श्रमाचे आणि शेतीचे महत्त्व सांगणारी स्फूर्तिगीते तेथे ऐकू येत होती. स्पर्धेत जिल्हाभरातील घाटी आणि गावठी बैलजोड्यांची जोते सहभागी झाली होती. गेल्या आठवड्यात हा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ही अशी स्पर्धा गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात भरविली जात आहे.
या स्पर्धेच्या आयोजकांपैकी असलेले संतोष गोटेकर, सुनील घडशी, शशिकांत घडशी, सुरज भायजे, शेखर उकार्डे यांनी स्पर्धेमुळे झालेल्या बदलाची माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकरी आपल्या शेतातून आपल्याला वर्षभर पुरेल, एवढे धान्य पिकवतो. पण अलीकडे मनुष्यबळाची वानवा निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पूर्वीची सामूहिक शेतीची पद्धत अमलात आणली, तर चांगला बदल होईल. कोकणातील शेतकर्यांचे क्षेत्र मर्यादित असते. तेवढ्यासाठी बैल पोसणेही शक्य होत नाही. असे चार-पाच शेतकरी आले, तर खर्च विभागला जाईल आणि एकमेकांना शेतीत मदत केली, तर कमी वेळेत शेती होईल, हे शेतकर्यांना पटवून दिले.
पोंक्षे आंबव येथे शनिवारी पार पडलेल्या या नांगरणी कार्यक्रमात गावठी बैल जोडीमध्ये अमोल जाधव (खेरशेत) पहिला क्रमांक, विजय भुवड (तुरळ) दुसरा क्रमांक, शिवराम किंजळकर (गोळवली) तिसरा, किरण कदम (रामपूर) चौथा, मनोहर चाळके (चिंचघरी) पाचवा यांनी यश मिळवले. घाटी जोड्यांमध्ये स्वराज गुरव (आरवली) पहिला क्रमांक, समीर बने (कोसुंब) दुसरा, देवजी भायजे (आंबव) तिसरा, नीलेश नाचरे (आरवली) चौथा तर सुजन पिलणकर (आरवली) यांच्या बैलजोडीने पाचवा क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला शेकडो रसिक शेतकरी उपस्थित होते.