लांजा-पडवण येथे आढळला तरुणाचा मृतदेह
लांजा : तालुक्यातील पडवण गावच्या हद्दीमध्ये कोकण रेल्वे पुलाच्याखाली एका 30 वर्षीय तरुणाची कवटी फुटून गंभीर दुखापत झालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या डाव्या हाताची बोटे देखील तुटलेली असल्याने ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. या तरुणाची अद्यापही ओळख पटली नसल्याची माहिती लांजा पोलिसांनी दिली आहे.
तालुक्यातील पडवण कोकण रेल्वे ब्रिजच्याखाली नदी किनारी हा मृतदेह येथील स्थानिक नागरिकांना आढळून आला. त्यानंतर याबाबतची खबर लांजा पोलिसांना देण्यात आली. खबर मिळताच लांजा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या मृत तरुणाच्या छातीवर तरुणीचे नाव लिहिलेले आहे. त्यामुळे हा सारा प्रकार प्रेम प्रकरणातून घडलेला असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या तरुणाची डोक्याची कवटी पूर्णपणे फुटून उघड्या स्थितीत आढळून आली आहे. त्याची उंची 5 फूट 2 इंच असून छातीवर इंग्रजीत ‘रवीना व जानू असे नाव गोंदलेले आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलिस करीत आहेत.