
रत्नागिरी जिल्ह्यात उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवाचे आयोजन
आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दि.26 व 29 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व इतर भागिदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या दि. 25 ते 30 जुलै 2022 या कालावधीत हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा मागोवा घेऊन ऊर्जेचे भविष्यकालीन 2047 पर्यंतचे नियोजनाचा वेध घेण्यात येणार आहे. दि.26 जुलै रोजी सकाळी 11.00 वा. अल्पबचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व दि.29 जुलै रोजी दुपारी 3.00 वाजता स्व.लक्ष्मी बाळासाहेब माटे हॉल, शासकीय विश्रामगृहासमोर, चिपळूण येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत गत आठ वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या सौभाग्य, दीनदयाल ग्रामज्योती, एकात्मिक ऊर्जा विकास, प्रधानमंत्री कुसुम योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना,मुख्यमंत्री सौर कृषिपंप, उच्चदाब वितरण प्रणाली-कृषीपंपाना वीजपुरवठा, कृषिपंप वीज जोडणी धोरण-2020, जिल्हा नियोजन व विकास समिती निधी इ. योजनांच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रातील विकास कार्यक्रम, ग्राहकाधिकार बाबत या महोत्सवात पोस्टर्स, चित्रफिती, पथनाट्याव्दारे जनजागृती केली जाणार आहे. विविध योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा सन्मान कार्यक्रमात केला जाणार आहे. या महोत्सवात सहभागाचे आवाहन नोडल अधिकारी तथा अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांनी केले आहे.