देवरूखच्या उपनगराध्यक्षा सान्वी संसारे सोमवारी देणार राजीनामा
देवरूख : नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा सान्वी संसारे वैद्यकीय कारणामुळे आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा सोमवारी देणार असल्याची माहिती मनसेचे देवरूख शहराध्यक्ष सागर संसारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवरूख शहरातील महाराष्ट्र निर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सागर संसारे यांनी म्हटले की, देवरूख नगर पंचायतीवर भाजप, मनसे आणि आरपीआयची सत्ता असून मनसेच्या सान्वी संसारे यांची उपनगराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर आजपर्यंत दीड वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. विकासकामे करून त्यांनी केवळ दिड वर्षात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्या प्रभाग क्र. 12 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. सान्वी संसारे यांनी वैद्यकीय कारणामुळे व नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्याकडे त्या उपनगराध्यक्ष पदाचा सोमवारी राजीनामा सुपूर्द करणार आहेत. उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे प्रभाग क्र. 12 मध्ये काम सुरू राहील, असे सागर संसारे यांनी सांगितले. या वेळी घेण्यात आलेल्या पत्रकार पत्रकार परिषदेला मनसेचे तालुकाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक अनुराग कोचिरकर, तालुका उपाध्यक्ष शेखर नलावडे, सनी प्रसादे, मनविसेचे देवरूख शहराध्यक्ष ऋतुराज देवरुखकर आदी उपस्थित होते. दरम्यान, सान्वी संसारे या सोमवारी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्यामुळे उपनगराध्यक्षपदी आता कोणाची वर्णी लागणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.