पावसाने कुठेही शेतीचे नुकसान नाही; कृषी विभागाचा दावा
रत्नागिरी : जिल्ह्यात कुठेही पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याची नोंद नसल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात जवळपास 70 टक्के भात लागवड झाली आहे. म्हणजेच सुमारे 67 हजार हेक्टरपर्यंत ही लागवड झाली आहे. मात्र गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील विशेषतः चिपळूण, खेेड, राजापूर , रत्नागिरी, लांजा, गुहागर आणि संगमेश्वर आदी भागात पूरस्थिती तर काही भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचून गोंधळ उडाला होता. भात शेतीतही पाणी जाऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती काही शेतकर्यांनी दिली. अलीकडेच काही शेतकर्यांनी पेरणीनंतर मोठ्या प्रमाणात भात लागवड केली होती. त्यानंतर अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या शेतात पाणी साचून राहिल्याने भात कुजून नुकसान होईल, अशी शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवण्यात येत होती. त्यानुसार कृषी विभागाने सर्व तालुक्यांच्या कृषी अधिकार्यांना नुकसानीची माहिती घेऊन त्याचा अहवाल मुख्य कार्यालयात पाठवण्यास सांगितला. मात्र, गेल्या तीन चार दिवसांपासून कोणत्याही प्रकारच्या भातशेतीच्या नुकसानाबाबतचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सध्या तरी अतिवृष्टीमुळे कुठेही शेतीचे नुकसान झाली नसल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.