कुंभवडे शाळेच्या इमारतीचे छप्पर कोसळले
राजापूर : राजापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम असून शुकवारी दुपारी कुंभवडे शाळा नं.4 या शाळेच्या व्हरांड्यातील छप्पर कोसळल्याने नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. याचबरोबर तालुक्यात अन्य ठिकाणीही पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मागील काही दिवसांपासून राजापूर तालुक्यात दमदार पाऊस कोसळत आहेत. या पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. अशातच शुकवारी दुपारी कुंभवडे शाळा नं.4 या शाळेच्या व्हरांड्यातील छप्पर कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या शाळेच्या वर्गखोल्यांचे छप्परही नादुरूस्त असून विद्यार्थी धोकादायक स्थितीत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शाळा इमारतीच्या दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. तसेच कोंड्ये येथील प्रकाश भागोजी जाधव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे.