संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे येथील प्रगतीशील शेतकरी दिलीप ढोल्ये यांचे निधन
संगमेश्वर दि . ६ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे येथील प्रगतीशील शेतकरी आणि दूध व्यावसायिक दिलीप गोविंद ढोल्ये ( ६९ ) यांचे आज रत्नागिरी येथे उपचारा दरम्यान निधन झाले .
दिलीप ढोल्ये हे शेती मध्ये विविध प्रयोग करीत असत . विविध प्रकारची पिके घेऊन त्यांनी शेती मध्ये आधुनिकतेची कास धरली होती . त्यांच्या शेती आणि विविध लागवडी मधील प्रयोग पहाण्यासाठी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी , बागायतदार असुर्डे येथे येत असत . विशेष म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाचे उत्तम आगतस्वागत करुन दिलीप ढोल्ये हे शेती प्रयोगाबद्दलची माहिती कोणताही आडपडदा न ठेवता देत असत . असुर्डे परिसरात त्यांची ओळख भाई अशी होती . लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांजवळ त्यांचे उत्तम स्नेहसंबंध होते .
संगमेश्वर परिसरातील एक यशस्वी दुग्ध व्यावसायिक अशी त्यांची गेली अनेक वर्षे ओळख राहिली . दररोज सकाळी रतिबाचे दूध वेळेत पोहचवणे हे त्यांच्या व्यवसायाचे खास वैशिष्ट्य असल्याने दुधाच्या माध्यमातून घराघरात त्यांचे कौटुंबिक नाते जोडले गेले . दूध व्यवसायाबरोबच गेली अनेक वर्षे त्यांनी दर्जेदार म्हैशी खरेदी विक्रीचा देखील यशस्वी व्यवसाय केला . त्यांच्याकडे येणारी एकही व्यक्ती त्यांनी कधीही चहा घेतल्याशिवाय परत पाठवली नाही . याबरोबरच घरात असणारा भाजीपाला , चिकू , खरवस , केळी यापैकी वेळेला जे उपलब्ध असेल ते आलेल्या माणसाच्या हातात दिल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे . अत्यंत हौशी , हसतमुख , सदैव आनंदी आणि स्वतःचे दु:ख विसरुन दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची खास ओळख होती .
गेली काही वर्षे दिलीपभाई हे मधुमेहाने त्रस्त होते . त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही . अखेरीस त्यांना दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . उपचार सुरु असतांनाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्यावर असुर्डे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि असंख्य नागरिक उपस्थित होते . दिलीप ढोल्ये यांच्या पश्चात पत्नी , विवाहित मुलगी , मुलगा , सून , नातवंडे , भाऊ असा मोठा परिवार आहे .