भातलावण्या सुरू झाल्या तरी युरिया खताची टंचाई
रत्नागिरी : जिल्ह्यात आता पाऊस सक्रिय झाल्याने भात लावणी सुरू झाली आहे. मात्र भातरोपावर खताची मात्रा देण्यासाठी युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. खतटंचाईने कृषी विभागाने राबविलेल्या थेट बांधावर खत पुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
याबाबत प्रशासनाने जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तत्काळ युरिया खते उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले आहेत. भातशेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली आहे. अशा परिस्थितीत आवश्यक असणार्या पहिल्या युरिया खताचीच कृषी केंद्रात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. भाताच्या रोपांची वाढ होत असताना त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी युरिया खताची मात्रा योग्य वेळेत देणे आवश्यक आहे. मात्र, खताची कमतरता भासू लागल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.