कर्नाटक येथे गुरे घेऊन जाणार्‍या टोळक्याला राजापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करत पकडले

राजापूर : लांजा तालुक्यातून कर्नाटक येथे गुरे घेऊन जाणार्‍या टोळक्याला राजापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करत अटक केले आहे. सोमवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ओणी-पाचल मार्गावर हे थरारनाट्य घडले. या प्रकरणी पोलिसांनी विवेक शामराव कांबळे (वय 41), प्रणव ऊर्फ रोहित अजित कांबळे (वय 23) (दोघे राहणार पडलिहाळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) तसेच तबरेज चांदमियाँ ठाकुर व चांदमियाँ अब्बास ठाकुर (रा.परटवली, ता.राजापूर) यांना अटक केली आहे.    
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सचिन वीर यांना  गुरे घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला होता. ओणी ते पाचल रोडवर सपोनि अमोल गोरे, पोलिस नाईक वीर, पोलिस शिपाई  घोगले, श्री. घोळवे तसेच वाहन चालक श्री.बाणे असे पेट्रोलिंग करीत असताना ओणी-पाचल  मार्गावर 10.15 वा.च्या दरम्यान ओणी दैतवाडी गणेश मंदिर येथून चार चाकी काळसर इंडिगो गाडी व त्याच्या मागून एक महेंद्रा जिनिओ गाडी (क.एम.एच.04/एफपी/6424) ही भरधाव वेगामध्ये पाचल दिशेला जात असताना दिसून आली.  
त्यावेळी दोन्ही गाड्यांना थांबण्याचा इशारा दिला असता सदर  गाडी न थांबवता  पुढे पाचलच्या दिशेने गाडी गेली. महेंद्रा जिनिओ गाडीचा हौदा कापडाने झाकलेल्या स्थितीत बंद असल्याने सदर गाडीचा संशय आला म्हणून सदर दोन्ही वाहनांचा पाठलाग केला. काही अंतरावर सौंदळ पाटीलवाडीच्या जवळ वळणावर या गाड्या अडविल्या.  
यावेळी पोलिसांनी गाड्यांची तपासणी केली असता गाडीच्या हौद्यामध्ये 1 बैल व 7 गायी   बसवून त्यांना  निपाणी येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी विवेक कांबळे, प्रणव उर्फ रोहित कांबळे तसेच तबरेज ठाकूर व चांदमियाँ ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच त्यांच्याजवळील चार चाकी महेंद्रा जिनिओ गाडी व 1 बैल, 7 गायी असा माल जप्त करण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button