मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या चोळई येथे दरड कोसळली; 75 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
पोलादपूर : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुक्यातील सडवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चोळई गावात दरड कोसळली आहे. पोलादपूर तालुका आपत्ती निवारण कक्षाने तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चोळईतील सुमारे 75 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार समीर देसाई यांनी दिली. पोलादपूर तालुक्यात रात्रीपासूनच धुवाँधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. गेल्यावर्षी याठिकाणी उत्खननामुळे दरडीचा धोका लक्षात घेऊन चोळईच्या ग्रामस्थांनी उठाव केला होता. मात्र, त्यावेळी अतिवृष्टीकाळात दरड न कोसळल्याने कोणताही संघर्ष झाला नव्हता. यंदा पावसाचा जोर वाढताच चोळई येथील या उत्खननाच्या ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली. प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचा उपाय म्हणून चोळई येथील 20 कुटुंबांतील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्यामंदिर पोलादपूर येथे हलविले असल्याचा दावा केला आहे. मात्र, याठिकाणी अनेक ग्रामस्थांनी जीवाच्या भीतीने आपापल्या परगावातील नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरडी कोसळल्याच्या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराचा भाग कापण्यात आला असून पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे दगड मातीसह महामार्गावर खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे पोलादपूर तालुका प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यावेळी नायब तहसीलदार समीर देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांसह आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.