शेतकर्यांना 50 हजारांपर्यंत अनुदान; 1 जुलैपासून अंमलबजावणी
रत्नागिरी : कोरोनाकाळात दोन खरीप हंगाम अडचणीचे गेल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले. यामुळे त्यांना आर्थिक आधाराची गरज असताना आता नियमित कर्ज फेड करणार्या शेतकर्यांना 50 हजारांपर्यंतची प्रोत्साहन अनुदान योजना कृषी दिनापासून (1 जुलै) लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कोकणातील सुमारे 88 हजार शेतकर्यांना मिळणार असून या योजनेत शेतकर्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कोरोना प्रादुर्भावाने दोन खरीप हंगाम अडचणीत गेले. त्यानंतर गतवर्षी अवकाळीने अनेक भागात कृषी हानी झाली. कोकणात अतिरिक्त पावसानेही अनेक भगात पीक वाहून गेले. अशा स्थितीत अडचणीत असलेल्या शेतकर्यांना आता प्रोत्साहन अनुदान योजना लागू करण्यात आली आहे. कृषी कर्ज घतलेल्या शेतकर्यांना ज्यांनी नियमित कर्ज फेड केली आहे, अशा शेतकर्यांना ही योजना लागू करण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण ऑनलाईन असून अलीकडेच या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. नियमित कृषी कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्याला शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. शेतकर्यांना विविध लाभ मिळावेत आणि त्यांना संकटकाळी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आली आहे. शेतकर्यांना प्रत्येकी 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान फक्त कर्जमाफीवेळी नियमित कर्जदार असलेल्यांना नाही तर 2017-18 पासून 2020 पर्यंत थकबाकीत नसलेल्यांनाही देण्यात येणार आहे. ही योजना यावर्षी कृषी दिनापासून लागू करण्यात येणार आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभीच ही योजना शेतकर्यांना आधाराची ठरणार असून यामध्ये सहभागासाठी शेतकर्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले
आहे.