हातिवले-गोठणे-डोंगर रस्त्याची दुरवस्था
राजापूर : गतवर्षीच्या अतिवृष्टीत पूर्णपणे दुरवस्था झालेल्या तालुक्यातील हातिवले-विखारे-गोठणे ते डोंगर या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. ग्रामीण मार्ग 18 च्या विखारे-गोठणे ते डोंगर दरम्यान भागातील दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे.
जर का या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली नाही तर डोंगर व विखारे गोठणे गावातील ग्रामस्थांसमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा डोंगर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश मराठे व विखारे गोठणे गावातील मंगेश पावसकर यांनी दिला आहे.
गतवर्षी जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये राजापूर तालुक्यामध्ये अनेक रस्ते खराब झाले. विखारे-गोठणे ते डोंगर दरम्यान रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होऊन दोनही गावातील जनतेची दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली. ही घटना घडल्यावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नेते यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. वर्षभरात विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून तालुक्यामध्ये ‘आम्ही करोडो रुपयांचा निधी कसा आणला आहे’, हे सांगितले जात आहे, परंतु विखारे गोठणे व डोंगर ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या व दळणवळण ठप्प झालेल्या या रस्त्यासाठी निधी का मिळाला नाही? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.