दापोलीचे आमदार योगेश कदम बंडात सामील झाल्यानंतर आता माजी आमदार सूर्यकांत दळवी ‘मातोश्री’वर
दापोली : शिवसेनेत अंतर्गत झालेल्या बंडखोरीला चोख उत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील माजी आमदार आणि कार्यकर्ते यांना मातोश्रीवर पाचारण केले जात आहे. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे देखील काही दिवसांपासून मातोश्रीवर तळ ठोकून आहेत. त्यामुळे आगामी काळात माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे दापोलीच्या पक्ष नेतृत्वाची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. दापोलीतील शिवसेनेचे काही पदाधिकारी देखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात दापोलीत शिवसेनेत अंतर्गत घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी हे मागील 25 वर्ष दापोली मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. 25 वर्ष दळवी यांनी मंत्रिपदाची अपेक्षा न करता मतदारसंघाचे नेतृत्व केले. असे असतानाही शिवसेनेतील नवखे नेतृत्व योगेश कदम यांना उमेदवारी देऊन पक्षाने काही काळ दळवी यांना दूर लोटले. योगेश कदम हे आमदार झाल्यानंतर दापोली मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या राजकीय घडामोडी दळवींसाठी अनुकूल ठरल्या. त्यानंतर दापोलीत सूर्यकांत दळवी यांचे महत्त्व वाढू लागले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष अंतर्गत केलेल्या बंडात आमदार योगेश कदम सामील झाल्याने दापोलीत नेतृत्व बदलाच्या हालचाली मातोश्रीवरून सुरू झाल्या आहेत.