आला पावसाळा : दक्षता पाळा- वीज अपघात टाळा : नागरिकांना महावितरणचे आवाहन

रत्नागिरी : पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. अपघातमुक्त पावसाळ्यासाठी नागरिकांनी विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसात वीजयंत्रणेतील तारा तुटणे , खांब वाकणे किंवा पडणे, रोहित्र (डिपी स्ट्रक्चर) वाकणे किंवा पडणे, वीजतारांवर झाड वा झाडांची फांदी तुटून पडणे असे प्रकार होतात. तुटलेल्या विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्र आदींसह विद्युत यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्पर्श करणे टाळावे. याबाबत महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास त्वरित सूचना द्यावी. ग्राहकांना दर्जेदार व तत्पर वीजसेवा पुरविणे महावितरणचे लक्ष्य आहे. वादळ-वारा व पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. विद्युत यंत्रणेतील कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती वा तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे.
पावसाळ्यात पक्षी बसून तारा एकमेकांच्या संपर्कात आल्यास, वीजतारांवर फांदी पडल्याने तारा तुटून पडणे आदी घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होतो. तुटलेल्या वीज तारांना अनावधानाने मनुष्य वा प्राण्यांचा स्पर्श होऊन धोका उद्भवू शकतो. तेव्हा अचानकपणे गाव किंवा परिसराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी महत्त्वाच्या कारणाशिवाय तत्काळपणे संबंधित उपकेंद्रास संपर्क करणे टाळावे. या वेळेत उपकेंद्रचालक संबंधित लाईनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतो. दुरूस्तीच्या कामासाठी विद्युत पुरवठा चालू वा बंद करण्यासंदर्भात सूचनांचे आदानप्रदान सुरू असते, किंवा घटनास्थळावरून एखादी व्यक्ती उपकेंद्रचालकास घटना वा धोक्याबाबत सुचना देण्याचा प्रयत्न करीत असते.
वीजस्पर्श अपघाताची प्रमुख कारणे : घरात पाण्याच्या विद्युत मोटारीला स्पर्श, कपडे वाळत घालण्यासाठी वीजखांबास वा विद्युत प्रवाहित होईल अशा ठिकाणी बांधलेली विद्युत संवाहक तार ( कापडी वा विद्युत रोधक दोरी वापरावी), घरातील लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल(जाळी), फ्रिज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर आदी विद्युत उपकरणे, ठिकठिकाणी जोडण्यात आलेल्या वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरून स्पर्श झाल्याने, विद्युत खांब वा स्टे वायरला स्पर्श, शेतात ओल्या हाताने मोटार चालू करताना, तुटलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने, मोटारीसाठी वापरलेल्या आवरणरहीत वायरचा स्पर्श, वाहनाच्या टपावर वा मालवाहू ट्रक वा ट्रॅक्टरवर बसल्याने विद्युततारांना स्पर्श, ही अपघाताची प्रमुख व वारंवार दिसून येणारी कारणे आहेत. तरी नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी.
वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील बाबींची दक्षता घ्यावी :
उपकरणांचा पाण्याशी संपर्क टाळा :
पाणी हे वीज सुवाहक आहे. आपल्या घरातील स्विच बोर्ड वीजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्याशी संपर्कात येणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. वीज मिटरच्या जागी पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास, मिटर जवळचा मेनस्विच बंद करून महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. ओलाव्याच्या ठिकाणी उपकरणे हाताळतांना पायात रबरी चप्पल किंवा बुट घालावा. घरातील ओले कपडे वीजेची वायर व तारेवर वाळवण्यासाठी टाकू नये. एखाद्यास वीजेचा धक्का बसल्यास त्यास कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजूला करावे, त्वरित कृत्रिम श्वासोच्छवास देत  रूग्णालयात नेण्यात यावे.
आर्थिंग व घरातील वीज मांडणी तपासणी व दुरूस्ती :
शेतातील व घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अर्थिंग फार महत्त्वाची आहे. घरातील विद्युत उपकरणे, विद्युत संच मांडणी व जोडणी, आर्थिंग, वायरिंग सुस्थितीत असल्याची खात्री परवानाधारक व्यक्तिकडून करून घ्यावी. अर्थिंग  व वायरिंगमध्ये दोष आढळल्यास तत्काळ तो दोष परवानाधारक व्यक्तिकडून दुरूस्त केला पाहिजे. घरात सर्ववप्रथम स्विच बोर्डाअगोदर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर  बसवणे फार गरजेचे आहे. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरमुळे घरातील वायरींगमध्ये दोष निर्माण झाल्यास घरातील वीजजपुरवठा लगेच बंद होतो, संभाव्य वित्त व जीवित हानी (अपघात) टाळता येण्यास मदत होते. घरातील प्रत्येक स्वीच बोर्डापर्यंत अर्थ वायर पोहोचवून जोडणी करावी. इमारतीमध्ये वेगवेगळ्या विद्युत भाराकरिता क्षमतेप्रमाणे मिनीच्युर सर्कीट ब्रेकर  व मेन स्विचचा वापर करावा. त्यामुळे बाधित भागाचा वीजजपुरवठा त्वरित बंद होऊन सुरक्षित राहण्यास मदत होते. तसेच इतर भागातील वीजजपुरवठा सुरू असतो. घरातील जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरींग तत्काळ बदलण्यात यावी. आर्थिंग वेळोवेळी तपासून घ्यावी.
दर्जेदार उपकरणांचा वापर : फ्रिज,कुलर,मिक्सर,इस्त्री,गिझर,मोटार इत्यादी उपकरणांकरीता थ्री फेज पीन आणि सॉकेटचाच वापर करावा. आय.एस.आय.चिन्ह आणि योग्य दर्जा असलेली विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे.
बांधकाम करताना काळजी घ्या : लघुदाब, उच्चदाब किंवा अति उच्चदाब वाहिनीखाली कोणत्याही इमारतीचे किंवा इतर बांधकाम करु नये. तसेच इमारत/बांधकाम व  वाहिन्यांमध्ये नियमानुसार पुरेपूर आडवे अंतर असायला पाहिजे.
शेतात वीजवापर काळजी घ्या :
जनावरे, गुरे-ढोरे विजेच्या खांबास, ताणास तसेच वीजेच्या खांबाजवळ वा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. शेतीपंपाला वीजपुरवठा करणारी व अर्थिंगची वायर अखंड असावी. पाऊस चालू असतांना वीजेचा पंप चालू अथवा बंद करणे शक्यतो टाळावे. पाऊस चालू असताना रोहित्र, खांबाजवळ वा विजतारांखाली थांबणे टाळावे.
आपातकालीन स्थितीत शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अ‍ॅपवर वीजग्राहक तक्रार दाखल करू शकतात. महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास वीजपुरवठा खंडितची तक्रार नोंदविली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button