रत्नागिरीत शिवसेनेकडून विरोधकांना धक्का देण्यासाठी रणनीती
रत्नागिरी : नगर परिषद निवडणुकीची आरक्षण प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यानंतर आता निवडणुकीच्या तयारीला रंग चढू लागला आहे. शिवसेनेने विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी पक्षप्रवेश कार्यक्रम सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुहेल साखरकर यांचा नुकताच शिवसेना प्रवेश झाला. आता पुढे प्रत्येक पक्षातील अशी नेते मंडळी शिवसेनेत घेतली जाणार आहेत. नगरपरिषदेची निवडणूक गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच होण्याची आहे. नुकतीच आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रभागाअंतर्गत इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. शिवसेनेला पुन्हा बहुमत मिळेल अशी आशा असल्याने शिवसेनेकडे येणार्यांचा ओढा अधिक आहे. अशा राजकीय घडामोडीत ज्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार नाही ते विरोधी पक्षांच्या गळाला लागणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामसूम आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी निवडणूक माहोल बनविण्यास प्रारंभ केला आहे. शिवसेनेचे नेते किरण उर्फ भैया सामंत आणि ना. उदय सामंत यांनी रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे.