भरणे उड्डाणपूल वाहतुकीस खुला; एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण
खेड : भरणे नाका येथील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल दि.16 रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला. उड्डाण पुलावरील एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. तीन वर्ष चौपदरीकरण कामात भरणेनाक्यात उड्डाण पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे परिसरात अपघात होत होते. सोबत वाहतुकीचा बोजवारा उडायचा. गणेशोत्सव, होळी व उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत होती. आता येथील हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला आहे. येथे सुरुवातीला भुयारी मार्ग प्रस्तावित होता. मात्र अचानक येथील भुयारी मार्ग रद्द करून उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलाचे काम सुरू झाल्यावर आंबवली विभागातील सुमारे 15 गावांकडे जाणार्या वाहनचालकांना हेलपाटा मारावा लागत होता.