
कादवड परिसरात गाळ उपसा
चिपळूण : जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कादवड रामवाडी, देऊळवाडीमधून जाणारा ओढा गाळाने पूर्णपणे भरून गेला. यातील गाळ उपशाला आता प्रारंभ झाला आहे.
गतवर्षी ओढ्याला मोठे पाणी आल्यामुळे रामवाडीतील काही घरांना धोका निर्माण झाला होता. पुन्हा कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी रामवाडी-देऊळवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत कादवडचे विद्यमान सदस्य स्वप्नील शिंदे यांच्याकडे ही बाब मांडली.
यानंतर आ. शेखर निकम व नाम फाऊंडेशनच्या निदर्शनास ही बाब शिंदे यांनी आणून दिली. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अभिलाष यांनी पोकलेन उपलब्ध करून दिला. यानंतर दि. 16 जूनपासून येथे गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. यावेळी दिलीप शिंदे, सखाराम शिंदे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व ग्रा.पं. सदस्य स्वप्नील शिंदे, मार्गदर्शक जे. के. शिंदे, संतोष शिंदे, ग्रा.पं.सदस्य सबा चौघुले, अनंत शिंदे, सखाराम शिंदे, रविंद्र शिंदे, चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते.