महावितरणकडून अचूक मीटर रीडिंगसाठी विविध उपाययोजना; ४७ एजन्सीज बडतर्फ

लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने गेल्या फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील ८ एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या धडक उपाययोजनांमुळे मीटर रीडिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली असून महावितरणच्या महसूलात देखील वाढ झाली आहे.
वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. यात अतिशय महत्वाच्या बिलिंगसाठी वीजमीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबतीत आढावा घेताना १०० टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांना आढळून आले. या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली व महावितरणच्या इतिहासात प्रथमच राज्यातील थेट सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांची व्हीसीद्वारे ताबडतोब आढावा बैठक घेतली होती. ‘कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रिडींग घेण्यात हयगय करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध कारवाई करावी’ असे निर्देश त्यांनी दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button